कधी कधी आयुष्यात एखादी छोटीशी गोष्ट घडते, एखादी व्यक्ती नकळत एक शब्द बोलून जाते… आणि तोच एक शब्द आपल्या मनात घर करून बसतो.
दिवस जातो, रात्र होते, आपण इतरांसोबत हसतो, बोलतो, सगळं काही नेहमीसारखं करतो… पण मनाच्या एका कोपऱ्यात तो शब्द सतत घुमत राहतो.
“मी असं काय केलं होतं?”
“त्या व्यक्तीने असं का म्हटलं असेल?”
“माझ्यातच काही कमी आहे का?”
प्रश्न खूप असतात, पण उत्तरं मात्र मिळत नाहीत.
आणि मग सुरू होतं Overthinking…
आपण त्या व्यक्तीच्या एका शब्दाचा इतका विचार करतो की स्वतःची शांतताच हरवून बसतो. ती व्यक्ती कदाचित तो शब्द बोलून विसरूनही गेलेली असते, पण आपण मात्र तोच शब्द मनात घेऊन बसतो.
पण आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे…
एखाद्या व्यक्तीच्या एका शब्दासाठी मी माझी संपूर्ण मानसिक शांतता का गमवायची?
हो, मनाला लागलंय. दुःख झालंय. कदाचित अपेक्षा जास्त होत्या म्हणूनही दुखावलं गेलं असेल. आपल्या भावना चुकीच्या नाहीत. पण त्या भावनांमध्ये स्वतःला हरवून बसणंही योग्य नाही.
प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायची गरज नसते. प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायची गरज नसते. आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनात इतकी जागा देण्याचीही गरज नसते की तिच्या बोलण्याने आपला संपूर्ण दिवस खराब व्हावा.
कधी कधी शांत राहणं म्हणजे आपण हरलो असं नसतं. शांत राहणं म्हणजे आपण आपल्या मनाची काळजी घेत आहोत.
आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची :
मी प्रत्येकाच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्या शब्दांना माझ्या आयुष्यावर किती परिणाम करू द्यायचा, हे हळूहळू शिकू शकतो.
ज्याने दुखावलं त्याला लगेच दोष द्यायचा नाही, पण स्वतःलाही सतत दोष द्यायचा नाही.
कदाचित त्या शब्दामागे काही वेगळा अर्थ असेल. कदाचित नसेलही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं नाही. काही गोष्टी स्वीकारून पुढे जाण्यातच मनाची खरी शांतता असते.
आता स्वतःला वेळ द्यायचा आहे. स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायचं आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे पुन्हा लक्ष द्यायचं आहे.
कारण माझं आयुष्य फक्त एका व्यक्तीच्या शब्दाभोवती फिरण्यासाठी नाही.
माझीही स्वप्नं आहेत, माझंही भविष्य आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझं स्वतःचं मन आहे, ज्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.
शेवटी स्वतःसाठी फक्त एवढंच…
“तो एक शब्द माझ्या मनाला लागला, पण आता तो माझ्या संपूर्ण आयुष्यावर राज्य करू देणार नाही. मला दुःख झालंय, पण मी या दुःखापेक्षा मोठा आहे. मला प्रत्येक गोष्ट विसरता येईलच असं नाही, पण त्या गोष्टीचा विचार करत स्वतःला त्रास देणं मी हळूहळू कमी करू शकतो.”
काही शब्द मनाला लागतात, पण प्रत्येक शब्दाला आपल्या आयुष्याची दिशा ठरवू द्यायची नसते.
आज स्वतःला थोडी शांतता दे. प्रत्येक गोष्ट आजच सोडवायची गरज नाही. काही उत्तरं वेळ देतो, तर काही प्रश्नांचं उत्तर शोधणं आपणच सोडून देतो.
आणि हो… स्वतःशी प्रेमाने वागायला विसरू नकोस. कारण जगातल्या सगळ्या लोकांना समजू
न घेताना आपण स्वतःलाच समजून घ्यायला विसरतो.
_______
हे सर्वांच overthinking कमी व्हावं म्हणून टाकलेलं आहे..

Comments
Post a Comment