बाबासाहेब :नवभारताचे निर्माते भाग 3




 बाबासाहेब :नवभारताचे निर्माते भाग 3.. 

              समाजाची जुनी मूल्ये आणि जुनी दैवते फोडणारे ते केवळ मूर्तिभंजक नव्हते तर चिरंतन मूल्यांवर आधारलेले नवे जीवन घडणारे ते एक प्रतिभाशाली मूर्तिकार आहेत. स्वातंत्र्य भारताची घटना आणि हिंदू धर्माची नवस्मृती या त्यांच्या विधायक बुद्धिमत्तेच्या अमर निशाण्या होत. ज्ञानाची गंगा समाजाच्या भावनेने थरापर्यंत पोहोचल्यावाचून देशाला उद्धार होणार नाही या एका भावनेने आपले सर्वस्व त्यांनी आता ज्ञानदानाच्या कार्यास वाहून टाकलेले आहे. समाजात नवीन नवीन विचारांचा, नवीन प्रेरणांचा आणि नवीन दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा म्हणून अष्टौप्रहर ज्ञानाचे कुंड पेटवून बसलेले ते भारतातले एक ब्रह्मर्षी होत. त्यागाचा, सेवेचा आणि ज्ञानाचा एवढा थोर वारसा ज्यांनी भारताला दिलेला आहे, त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवणे हे आजच्या तरुण पिढीचे कर्तव्य आहे............... 

                       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अद्याप संपलेले नाही. भारताची घटना लोकसभेपुढे मांडताना त्यांनी देशाला स्पष्ट इशारा देऊन ठेवलेला आहे, तो हा कि, या देशात सामाजिक आणि आर्थिक समता जर लवकर प्रस्थापित झाली नाही तर मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याच्या चिंधड्या झाल्यावाचून राहणार नाहीत ;समतेवाचून सामाजिक स्वातंत्र्य व्यर्थ होय. गेल्या पाच  वर्षात स्वातंत्र्याचा जनतेला जो अनुभव आलेला आहे, त्यावरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा किती योग्य आहे, याची कुणालाही कल्पना येईल. सामाजिक न्यायावर, समतेवर आणि सहकार्यावर आधारलेला नवसमाज या भारतात जर ताबडतोब अस्तित्वात आला नाही तर ब्रिटिश साम्राज्यशाहीपेक्षाही अधिक भीषण आपत्ती या देशावर कोसळल्याखेरीच राहणार नाही. आजच्या पक्षीय राजकारणाची आणि सामाजिक पूर्वग्रहांची धूळ जेव्हा वातावरणातून नष्ट होईल आणि जनतेच्या स्वातंत्र्याचा निः पक्षपाती इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यामध्ये 'नवभारताचे निर्माते 'असेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे यथार्थ वर्णन करावे लागेल, याविषयी आम्हाला तिळमात्र संशय नाही 

                         (साभार :दलितांचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर  .. 

-                             आचार्य प्र. कॆ. अत्रे................... )

                          Typer अविनाश भगत          .. 


(जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ )

{जय भीम नमो बुध्दाय जय विदर्भ }

Comments