बाबासाहेब :नवभारताचे निर्माते भाग 2.

 


बाबासाहेब :नवभारताचे निर्माते या भागातील 2 रा भाग पाहणार आहोत........... 
म. गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात आणि तत्वज्ञानात पुष्कळसे साम्य असूनही उभयतांच्या विरोधाला आणि शत्रुत्वालाच अधिक प्रसिद्धी मिळाली. दोघांच्याही जीवनाचे अधिष्ठान उच्चतम अशा नैतिक मानवी मूल्यांवर झालेले आहे. पण ही मूल्य हस्तगत करण्याचे उभयतांचेमार्ग  मूलतः भिन्न आहेत. समाजपुरुषांचे हृदयपरिवर्तन केल्यावाचून त्यांच्या आचारात किंवा विचारात क्रांती होणार नाही, ही म. गांधी यांची भूमिका होती. त्यांच्या उलट हजारो वर्षाच्या अन्यायमूलक रुढीमुळे क्रूर आणि भावनाशून्य बनलेल्या समाजपुरुषाच्या सर्वाम्गावर कठोर प्रहार केल्यावाचून समाजपुरुषाचे डोळे उघडणार नाहीत, ही परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका आहे. सत्याच्या आणि अहिंसेच्या तत्वावर सर्व समाजाची पुर्नघटना व्हावी याबद्दल म. गांधी यांचा जसा आग्रह होता. त्याप्रमाणे सध्याच्या समाजाची जीर्ण चौकट मुळापासून उखडून टाकावी आणि सामाजिक न्यायावर आणि समतेवर पुन्हा नवसमान या भारतात निर्माण व्हावा, असा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह होता. समाजाच्या पायावर डोके ठेऊन तो शुद्धीवर येणार नाही, त्याच्या बुद्धीवर आघात केले तरच तो जागृत होऊ शकेल, ही गोष्ट म. गांधी आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी सारखेच ओळखली होती. समाजाच्या भावनांना आणि विचारांना जबरदस्त धक्के देण्याच्या तंत्राचा म्हणून दोघांनी स्वीकार केलेला होता. 
धर्मांतराची घोषणा हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजाला दिलेला एक प्रचंड धक्का होता. ही घोषणा द्रोहाची  नसून निष्ठेची होती, ही गोष्ट दुर्दैवाने त्या काळी पुष्कळांच्या लक्ष्यात आली नाही. हिंदू समाजाला दुभंग करून त्याचा विध्वंस करण्याची च जर खरोखर भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांची इच्छा असती तर म. गांधी याचे प्राण वाचण्यासाठी आपल्या आग्रहाला मुरड घालून पुणे करारावर सही करावयास ते कधीच कबूल झाले नसते. अखंड भारताचा जन्मभर पुरस्कार करून  शेवटी ज्यांनी देशाच्या फाळणीला मान्यता दिली  आणि कोट्यवधी लोकांच्या प्राणांचा, अब्रूचा आणि मालमत्तेचा विध्वंस केला ते आज देशाचे उद्धारकर्ते बनलेले आहे. देशभक्तीचा सर्व सन्मान आणि प्रतिष्ठा आज त्यांना प्राप्त झालेली आहे. पण ज्यांनी पाकिस्तानाच्या राष्ट्रीय संकटाचा आधीपासून सर्वांना इशारा दिला आणि त्यापासून राष्ट्राने आपले कसे संरक्षण करावे याचा मार्गही दाखवून दिला ;एवढेच नव्हे, तर पाकिस्तानवाल्यांच्या सर्व अनुयायांना ठोकरून आपल्या कोट्यवधी अनुयायांसह स्वातंत्र्य भारतात राहावयाचे ज्यांनी ठरविले त्यांना देशाला राजकारणामध्ये आज कसलेही सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे स्थान असू नये, ह्यामध्ये अधिक मोठा कोणता अन्याय असू शकेल? भारतीय ऐकाचा आणि स्वातंत्र्याचा आणि त्यांच्याएवढा प्रचंड आणि  निष्ठावान पुरस्कर्ता या देशाला दुसरा नाही. ह्यामध्ये त्यांच्या जीवनाचे अधिक समर्पक वर्णन करता येणे शक्य नाही........... 
साभार :दलितांचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
-आचार्य प्र. कॆ. अत्रे.  
पाठातून शोधून लिहिणारा  अविनाश भगत.... 
(जय भीम  नमो बुध्दाय जय विदर्भ )

Comments