बाबासाहेब :नवभारताचे निर्माते.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतामध्ये एक युगप्रवर्तक पुरुष होते. अन्यायाने आणि विषमतेने गांजलेल्या कोट्यवधी भारतीय जनतेचा उद्धार करण्यासाठी जे जे थोर पुरुष शतकामध्ये जन्माला आले, त्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अग्रस्थान द्यावे लागेल. पुष्कळशा समाजसुधारकांचा दृष्टिकोन हा भूतदयावादी असतो. माणसांमधल्या चांगुलपणाला आवाहन करून अन्यायाचे निराकरण व्हावे असे त्यांना वाटत असते. म्हणून आपल्या प्रचारासाठी ते धर्माचे अधिष्ठान घेतात. या समाजसुधारकांपेक्षा बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचे आणि तत्वज्ञानाचे स्वरूप वेगळे आहे. मानवी समतेसाठी आणि हक्कांसाठी लढणारे ते एक झुंजार वीर आहेत. समाजाची दया किंवा उपकार त्यानां नको आहे. ह्या त्यांच्या तात्विक आणि कठोर भूमिकेमुळे पुष्कळांचा त्यांच्यासंबंधी गैरसमज होतो. महाराष्ट्राच्या बुद्धिवादी आणि कर्मयोगी परंपरेमध्ये ते जन्माला आले आहेत. हे लक्षात घेतल्यावाचून त्यांच्या निर्भय, नि:स्वार्थी आणि आक्रमक जीवनाचा अर्थ समजणार नाही.
म. ज्योतिराव फुले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, आगरकर यांनी जागृत आणि प्रक्षुब्ध केलेल्या सामाजिक वातावरणात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. दीडशे वर्षांपूर्वी भारताचे स्वातंत्र्य गेले, याला ब्रिटिश लोक जबाबदार नसून अनेक जातीयवादी आणि सामाजिक भेदांमुळे दुर्बल आणि निष्क्रिय झालेले आपण भारतातील लोक जबाबदार आहोत. न्यायाच्या, समतेच्या आणि ऐक्याच्या पायावर भारतीय जनता संघटित झाल्यावाचून या देशातील परकीय सत्ता नष्ट होणार नाही आणि या देशाला स्वातंत्र्याचे दर्शन घडणार नाही, या विचारांचा पगडा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनावर बसला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आड जातीभेद आणि अस्पृश्यता ही एक फार मोठी धोंड होती. ती नाहीशी झाल्याखेरीच परकीय सत्तेशी झगडणारी जनतेची लढाऊ आघाडी निर्माण होऊ शकणार नाही ही गोष्ट परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली. स्वातंत्र्याच्या राजकीय लढ्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फटकून राहिले, त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या काळात पुष्कळ गैरसमज निर्माण झाला. बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू आहेत किंवा ते ब्रिटिश साम्राज्याचे हस्तक आहेत, अशा तर्हेचा त्यांच्या विरोधकांनी प्रचार केला. शंकराने ज्याप्रमाणे विष पचविले त्याप्रमाणे अपमानाचे हे सारे हलाहल परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी धैर्याने सहन केले.
जय भिम नमो बुध्दाय जय विदर्भ.
Comments
Post a Comment