दि. 15 ऑक्टोबर 1956 नागपूर दिक्षा समारंभानंतर दिलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण भाग 9


 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण :

हजारो वर्षाची निरुत्साही परिस्थिती :

        या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होने शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातूर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातुक आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे कि शुद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे. शूद्रांचे काय ?चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही. ही रूढी नाही हा धर्म आहे. 

चातुवर्ण्य, गांधी व नष्ट धर्म :

       हिंदुधर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले, मी चातुवर्ण्य मानतो, मी म्हणालो, तुमच्यासारखे महात्मे चातुवर्ण्य मानतात !पण हे चातुवर्ण्य कोणते व कसे? (हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येथील असा हात करून )हे चातुवर्ण्य उलट कि सुलट चातुवर्ण्याची सुरुवात कोणीकडून व शेवट कोठे? गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल !हा मी हिंदुधर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदुधर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्ट धर्म आहे. 

आम्हाला शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर :

        आपला देश परकीयांच्या ताब्यात कां गेला? युरोपमध्ये 1945 पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रुटभरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणून शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे !क्षत्रिय मेले कि आम्ही खलास !आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते !!

उत्कर्ष बौद्धधर्मानेच होईल !:

        हिंदुधर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्मरचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींचा फायदा आहेत हे खरे आहे. पण इतरांचे काय? ब्राम्हण बाई बाळंतीण झाली कि तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे, तिकडे असते. अशी विचित्र रचना ही हिंदुधर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्धधर्मातच होऊ शकेल. 

हे भाषण धम्मचक्र ते अनुवर्तन या पुस्तकातून घेतला आहे... पुस्तकाचे चित्र पुढील प्रमाणे.... :



बातम्या प्रकाशित करण्यासाठी 9561750423 या व्हाट्सअँप नंबरवर मला संपर्क करा.. 

Jay bhim नमो बुध्दाय. Jay विदर्भ... 

Comments